चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात आपल्या पत्नी आणि आईसमोरच व्यक्तीला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या घटनेबाबत प्रशासनाने योग्य पावले उचलावीत अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे.
याबाबत मिळलेली आधिक माहिती अशी की, ब्रम्हपुरी तालुक्यातील हलदी गावाचा रहिवासी राजेंद्र अर्जुन कमादी (५०) रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या आई आणि पत्नीसह कुंपण बनवण्यासाठी लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. तेव्हा अचानक त्याच्यावर वाघाने हल्ला केला. यावेळी त्याची आई आणि त्याची पत्नीदेखील समोरच होती. वाघाने त्याला फरफटत नेले. त्याची आई आणि पत्नी यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ पळून गेला. मात्र या घटनेत राजेंद्र याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेनंतर मात्र आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. चंद्रपूर हे वाघांसाठी प्रसिद्ध ठिकाण असून याठिकाणी अनेक पर्यटक वाघ बघायला येतात. मात्र ताडोबाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना जिव मुठीत घेऊन रहावे लागते. दरम्यान स्थानिक नेत्याने म्हटले की, अशा प्रकारच्या हल्ले होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाने प्रयत्न केले नाही तर स्थानिक जनता विरोध प्रदर्शन करेल.