मुंबई : मोटारसायकल चालवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक मोटार सायकलस्वार हे मुंबईमध्ये (Mumbai) विनाहेल्मेट मोटारसायकल चालवितात, तसेच मोटारसायकल चालविणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्तीसुद्धा हेल्मेटचा (Helmet Compulsion In Mumbai) वापर करत नाहीत. टू-व्हिलरवर मागे बसणाऱ्यांसाठीही आता हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. या संबधित परिपत्रक वाहतूक पोलीस (Mumbai RTO) मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
टू-व्हिलर चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी टू-व्हिलर चालवित असताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईच्या वाहतूक विभागाकडून नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, टू-व्हिलर चालक आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या १५ दिवसानंतर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून टू-व्हिलर चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारक असेल, पुढील पंधरा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. टू-व्हिलर चालकाचा ३ महिन्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.