मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा पार पडली. या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? पाहूयात...
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? :
माझ्या पुढच्या सभा ह्या मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ही होणार आहेत. या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. मी कुठेही बोललो तरी ते लोकांना कळणारच आहे. कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य काही उगवायचं थांबत नाही. सूर्य उगवतोच, त्यामुळे माझ्या सभांना आडकाठी करून काहीच उपयोग नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.
आम्ही जातीपातीच राजकारण करत नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण सुरू झाले, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही.
लाऊडस्पीकरचा विषय अचानक काढलेला नाही. हा विषय काढायचाच नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. लाऊडस्पीकरचा विषय यापूर्वी अनेकांनी काढला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लाऊन गोंगाट करणार असाल तर तुमच्या धार्मिक स्थळाबाहेर मोठ्यानं दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
लाऊडस्पीकर हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. तो विषय धार्मिक करणार असाल तर आम्ही धार्मिक पद्धतीनं उत्तर देऊ, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान, तसेच भोंगे उतरलेच पाहिजे, नाहीतर ४ तारखेपासून अजिबात ऐकणार नाही, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.