प्रतिनिधी / गडचिरोली : पावसाळ्याचे वेध लागले की जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची धावपळ सुरू होते. दरवर्षी 200 पेक्षा जास्त गावांना कोणत्याही वेळी पुराचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या गावांमध्ये रेशनचा साठा, औषधी आणि बचाव पथकाला सतर्क ठेवले जात आहे. यावर्षीही 212 गावांमध्ये संपर्क तुटण्याच्या शक्यतेने व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यातील 1688 गावांपैकी दक्षिण गडचिरोलीतील 6 तालुक्यांमधील गावांचा पुराच्या पाण्याचा फटका बसण्याचा अंदाज महसूल यंत्रणेने व्यक्त करून त्यादृष्टीने तयारी सुरू केली. बारमाही रस्ते आणि पूल नसल्यामुळे पुराचा वेढा पडतो. त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दरवर्षी काहींचा बळीही जातो. (Gadchiroli Floods 2022)
तीन महिन्यांसाठी एसडीआरएफची चमू द्या:
जिल्ह्यातील दरवर्षीची पूरपरिस्थिती पाहता राज्य आपत्ती निवारण पथकाची एक चमू पावसाळ्याच्या तीन महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात राहावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव मंजूर केल्यास या चमूला आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पाठवून पुरात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल.
- संजय मिना, जिल्हाधिकारी
सर्व ग्रा. पं. ना वीजरोधक यंत्रणा:
दरवर्षी वीज पडून होणाऱ्या दुर्घटनेत काही लोकांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी वीजरोधक यंत्रणा बसविली. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारतीवर वीजरोधक यंत्र बसविण्यात आले. यामुळे परिसरात पडणारी वीज खेचून घेतली जाईल.
या ठिकाणी येतो पूर:
जिल्ह्यात गोदावरी, प्राणहिता, वैनगंगा आणि इंद्रावती या प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना पूर येतो. 47 गावे नदीच्या काठावरच आहेत. 111 गावांना हमखास पुराचा फटका दरवर्षी बसतो. पुरामुळे 12 प्रमुख महामार्ग खंडित होतात. काही ठिकाणी यावर्षी पूल तयार झाले असल्यामुळे पुराचा फटका बसणाऱ्या गावांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
बचाव साहित्य वितरित:
पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात 14 रबर बोट तयार आहेत. याशिवाय काही बोटीची दुरुस्ती सुरू आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आणखी 5 बोटी खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे यावर्षी जवळपास 25 बोट उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
२४ तास नियंत्रण कक्ष:
जिल्हाधिकारी कार्यालयासह पोलीस अधीक्षक कार्यालय आणि तालुकास्तरावर तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहणार आहे.
शहरी भागासाठी नगर परिषद, नगर पंचायतीची यंत्रणाही सतर्क राहणार आहे. मनुष्यबळाअभावी ते 24 तास सेवा देणार नाही.