वर्धा : पत्नीला शारिरीक, मानसिक त्रास देणा-या पती आणि त्यांच्या प्रेयसी विरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही घटना जुनी वस्ती वरुड येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, प्रिती दिनेश राऊत (३४) रा. जुनी वस्ती वरूड हिचे लग्न रितीरिवाजानुसार पती दिनेश राऊत सोबत २०१५ साली झाले होते. त्याच्यापासून तिला दोन अपत्य आहे.
दिनेश कस्तुरबा मेडिकल कॉलेज सेवाग्राम येथे स्वयंपाक विभागामध्ये नोकरीवर असून तिथे कविता निखाडे ही सुद्धा काम करते. पती दिनेशचे तिच्या सोबत विवाहबाह्य संबंध आहेत. लग्न झाल्याच्या दोन वर्षां पर्यंत पतीने चांगली वागणूक दिली. परंतु, त्यानंतर त्यांचे कविता निखाडे हिच्या सांगण्यावरून पती शारिरीक व मानसिक त्रास देत आहे. या त्रासाबद्दल पत्नीने आई – वडिलांना माहिती दिली. त्यावेळी पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
तक्रार निवारण कक्ष येथे पत्नी – पतीमध्ये आपसात वाद मिटविण्यात आला होता. त्यानंतर, घरगुती कारणावरून झगडा, भांडण करून त्रास देणे सुरु होते. कविता निखाडे हिच्या सांगण्यावरून पती शारीरिक व मानसिक त्रास देत आहे. ६ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान पतीने भांडण करून मारहाण केली. घरून निघून जा, तुझी गरज नाही, असे म्हणून घराचे बाहेर काढले. त्यानंतर ती वडिलांच्या घरी गेली. पतीला कविता निखाडे ही माझे विरोधात भडकावित असल्याने माझे पती मला घरगुती कारणावरून शारिरीक व मानसिक त्रास देत आहे. या प्रकरणी प्रिती राऊत यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिस ठाण्यात पती दिनेश राऊत, कविता निखाडे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.