Elon Musk : टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये 9.2 टक्के शेअर्स विकत घेतले. यानंतर एलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होतील अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे की, एलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होणार नाहीत.
अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार दिला आहे. दरम्यान एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार देण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पराग यांनी सांगितलं की, संचालक मंडळात सामील असो किंवा नसो, आम्ही आमच्या शेअर होल्डर्सच्या सूचना आणि मतांना नेहमीच महत्त्व देतो. एलॉन हे ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनांसाठी तत्पर आहोत.
एलॉन मस्क यांची संचालक मंडळात नियुक्ती अधिकृतपणे 9 एप्रिलपासून लागू होणार होती. परंतु एलॉन यांनी त्याच दिवशी सकाळी संचालक मंडळात सामील होणार नसल्याचे सांगितले.