गोंदिया : कोरोनाकाळानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेची दारे खुली होतील, असे वाटत होते. परंतु, रेल्वे प्रशासन ही दारे खुली करायला तयार नसल्याचे दिसते. अजूनही मासिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. इतकेच नव्हे, तर नियमित (अनरिझर्व्ह) तिकीट देण्याचे आदेश असताना हे तिकीट दिले जात नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या एकापाठोपाठ तीन लाटा आल्या अन गेल्या. मार्च एंडिंगच्या दिवशी कोरोनाचे सर्व निर्बंध शासनाने हटविले. नाकातोंडावर अनिवार्य असलेला मास्कदेखील हटविला. सारे व्यवहार सुरळीत होत आहेत. खासगी वाहने, एसटी बसेस प्रवाशांनी भरगच्च होऊन धावत आहेत. परंतु, रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजूनही निर्बंध कायम ठेवले आहेत. महिना-दीड महिनाभरापूर्वीच राखीव असलेल्या बोगी हटवून त्या अनारक्षित कराव्यात, कोरोनापूर्वी काळात देण्यात येणारे तिकीट म्हणजे, रिझर्व्हेशन न करता नियमित तिकीट देण्यात यावे, असे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. परंतु, रेल्वे प्रशासन या आदेशाची अंमलबजावणी करताना दिसत नाही. अजूनही रिझर्व्हेशन केल्याशिवाय रेल्वेने प्रवास करता येत नाही. एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांकरिता उपलब्ध असलेली मासिक पासची (एमएसटी) सुविधादेखील एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बंद आहे.
लोकल गाड्यांमध्ये ही सुविधा असली तरी, गोंदिया – नागपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतेक लोकल, पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे या मासिक पासचा फारसा उपयोग होत नाही. रेल्वेचा प्रवास हा तिकीटाला परवडणारा असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक सकाळी गोंदिया शहरात कामानिमित्त येतात. सायंकाळी परतीचा प्रवास असतो. परंतु, नियमित तिकीट अन् मासिक पासची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तिकीटापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे. याबाबत रेल्वे सल्लागार समितीसह प्रवाशांनी अनेकदा ही समस्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. परंतु, अधिकारी वेळ मारून नेत असल्याचे अनेकांनी सांगितले. रेल्वेने ही सुपर लूट थांबवून सर्वसामान्यांसाठी रेल्वेची दारे खुली करावीत, अशी मागणी होत आहे.
इतवारी – रायपुर लोकलचे भिजत घोंगडे
सर्वसामान्य प्रवाशांची हक्काची रेल्वे, प्रत्येक स्टेशनवर थांबा असलेली इतवारी – रायपूर ही लोकल रेल्वेगाडी अद्याप रेल्वे विभागाने सुरू केली नाही. त्यामुळे, रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. चंद्रपूर – बल्लारशाह मार्गावर काही दिवसांपूर्वीच लोकल गाडी सुरू झाली. इतवारी – रायपूर गाडी सुरू करण्याचे घोडे कुठे अडले, हे कळायला मार्ग नाही. रेल्वेचे अधिकारीदेखील यावर बोलायला तयार नाहीत.