गोंदिया : कोरोना महामारीच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला अशिक्षितपणा, मागासलेपणा, गरिबी, लहान वयात लग्न करण्याच्या रूढी परंपरा, जाती व्यवस्था यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. हे कुठेतरी थांबावे म्हणून शासन, प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. अक्षयतृतीया मुहूर्त असो वा अन्य कोणत्याही दिवशी बालविवाहाचा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने तशी कंबर कसली आहे. त्यामुळे, आता पालकांना जन्मतारीख तपासूनच आपल्या पाल्यांना बोहल्यावर चढवावे लागणार आहे.
भारतीय संस्कृती विवाह ही समाजातील महत्त्वाची आणि सार्वत्रिक क्रिया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षयतृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे या मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. त्यामुळे, अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३ जून २०१३ च्या अधिसूचनेनुसार तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ (२००७ च्या ६) कलम १६ ची पोटकलमे (१) व (३) नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आणि प्रकल्पांतर्गत नेमलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्रामपंचायतस्तरावर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे, बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर किंवा इतर वेळेस होत असलेल्या विवाह समारंभात बालविवाह होणार नाही, या करिता प्रत्येक सुजाण नागरिकांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. १८ वर्षाच्या आत मुलीचे लग्न व २१ वर्षाच्या आत मुलाचे लग्न लावणे, कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून, बालकांशी विवाह करणाऱ्याला व करून देणाऱ्याला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते. त्यामुळे, पालकांनी आता वेळीच सावध व्हायला पाहिजे. बालविवाह थांबविण्याला स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे.