गोंदिया : जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणीटंचाई डोके वर काढू लागली असून जिल्ह्यातील तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आले आहेत. विशेष म्हणजे, भू-गर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत असतानाच येत्या काही दिवसांत पाण्याची समस्या आणखी उग्ररूप धारण करणार आहे. दरवर्षी गोंदिया जिल्ह्यातील अनेक तलाव, नद्या, नाले मार्च महिन्यापासूनच कोरडे पडू लागतात. यंदाही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागात असलेल्या हातपंप आणि विहिरींच्या पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर जल संकटाची छाया गडद होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
तलावाचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख् आहे. जिल्ह्यात चार मोठ्या धरणासह ९ मध्यम, २२ लघु प्रकल्प व गोंदिया पाठबंधारे विभागाचे ३८ मामा तलावासह जिल्हा परिषदेचे दिड हजार मालगुजारी तलाव आहेत. दरम्यान, यातील काही धरणातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत असतानाच काही धरणातून शेतीला सिंचन करण्यात येते. दरम्यान, तलावाचा जिल्हा असला तरी दरवर्षी जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे दिसून येते. यंदाही असेच काहीसे चित्र असून अनेक ठिकाणच्या विहीरी व विंधन विहीरीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. पाण्याची पातळी कमी असल्याने विहिरी आणि हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे विविध आजारांनी थैमान घालायला सुरूवात केली आहे.
सार्वजनिक हातपंपांची दुरवस्था
अनेक गावातील हातपंप नादुरूस्त असून या हातपंपाची दुरावस्ता झाली आहे. गावात ग्राम पंचायतीकडून हातपंप लावण्यात आले असले तरी देखभाल दुरुस्ती अभावी हे हातपंप निकामी ठरू लागले आहे. हे होत असतानाच ग्रामीण भागात असलेले तलाव, नाले कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर असल्याने पशुपालकांनी आपल्या दुभत्या जनावरांची तहान कशी भागवावी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॅन व्यवसाय जोमात
जिल्ह्यात कॅन व्यवसाय जोमात सुरू असून, गोंदिया शहराबरोबरच जिल्ह्यातील अन्य प्रमुख शहरांमध्येही कॅन व्यवसाय वाढला आहे. कॅन मध्ये असलेला पाणी आणि बाटलीबंद पाण्याचा दर्जा काय आहे ? त्याची चौकशी प्रशासनाकडून केली जात नाही.
विवाह सोळ्यात टँकरचा वापर
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण केल्याने विवाह सोहळ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी मिळू नये यासाठी विवाह सोहळ्याचे आयोजक सहभागी पाहुण्यांची तहान भागवण्यासाठी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत आहेत.