ब्रह्मपुरी :- तालुक्यातील आवळगाव येथे महाराष्ट्र विद्यालयात वर्ग 9 वि मध्ये शिकत असलेला 14 वर्षाचा गुणवंत शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळच्या सुमारास आपल्या घरच्या शेळ्या चारत होता. एकाबाजूला शेळ्या चरत असतांना आपल्या शेळ्यांच्या मागे काही अंतरावरती उभा राहून मोबाईलवर गाणे लावून ऐकत होता. पहिले लावलेले गाणे संपल्यानंतर दुसरे गाणे लावण्यासाठी खाली मान टाकून गाणे सर्च करीत असताना अचानक त्याच्या समोर वाघ येऊन उभा राहिला. दोघांच्याही नजरा एकमेकावर भिडल्या तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातातील मोबाईल त्या वाघाला फेकून मारला.
मोबाईल वाघाला लागताच वाघ मागे फिरला आणि शिकार न करताच शेताच्या दिशेने पळून गेला. हा आपल्या जागेवरती तसाच उभा राहिला. मुलाने समय सूचकतेने, हिमतीने आपल्या हातातील मोबाईल फेकून मारल्यामुळे स्वतःचा जीव वाचविला. अशा या धैर्यशील बालकाचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाघाच्या तावडीतून वाचला अशी परिसरामध्ये चर्चा सुरु आहे. या धैर्यशील बालकाचे गावभर व आजूबाजूच्या परिसरात कौतुक केल्या जात आहे.नावाने गुणवंत आपल्या समय सुचकतेने सुद्धा गुणवंतच ठरला.