वर्धा : इयत्ता ५ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेत जात असताना पाठलाग करत तू मला पसंद असून, माझ्याशी लग्न करशील काय, अशी चक्क मागणी घातली. ही घटना कारंजा तालुक्यातील सारवाडी येथून ३१ मार्च रोजी उजेडात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक केली आहे.
यातील अल्पवयीन विद्यार्थिनी सारवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेते. सदर मुलगी शाळेत जात असताना गावातीलच स्वप्नील ज्ञानेश्वर ढोबाळे हा नेहमी विद्यार्थिनीचा पाठलाग करीत असतो. गुरुवार ३१ मार्च रोजी सदर अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना स्वप्नील ढोबाळे हा तिच्या मागे आला आणि म्हणाला, तू मला पसंद आहे, मला तू आवडते, तू माझ्याशी लग्न करशील का, अशी चक्क मागणी घातली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने आरोपीचे नाव आई-वडिलांना सांगते म्हटल्यानंतर त्याने आई- वडिलांना घरी येऊन मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील ज्ञानेश्वर ढोबाळे रा. सारवाडी ता. कांरजा याच्याविरुद्ध तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एककीडे विवाहासाठी शासनाकडून मुलीचे वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्यासाठी हालचाली सुरू असताना दुसरीकडे केवळ ११ वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी घातल्याचा प्रकार पुढे आल्याने आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी होत आहे.