नागपूर : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीला स्वीकारण्याची इच्छा नसल्यामुळे तिला विकणाऱ्या युवतीने आता ‘यू-टर्न’ घेतला आहे. तुरुंगात गेल्यानंतर, तिने कुटुंबीयांच्या माध्यमातून मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकरणातील सूत्रधार बोगस डॉक्टर विलास भोयरने नवजात बाळांच्या खरेदी-विक्री केल्याच्या शंकेमुळे पोलीस या रॅकेटमधील इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत.
गुन्हे शाखेने १५ दिवसांपूर्वी या रॅकेटचा पर्दाफाश करून बोगस डॉक्टर विलास भोयर, त्याचा साथीदार राहुल ऊर्फ मोरेश्वर निमजे, तसेच नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊतला अटक केली होती. तपासात मिळालेल्या तथ्यांच्या आधारावर नवजात मुलीला जन्म देणाऱ्या २३ वर्षांच्या युवतीला अटक करण्यात आली. तिने २९ जानेवारीला मुलीला जन्म दिला होता. त्याच्या पाच दिवसांनंतर भोयर आणि त्याच्या साथीदारांनी नवजात मुलीला हैदराबादच्या दाम्पत्याला ७ लाखांत विकले होते.
सदर युवती अनैतिक संबंधातून गर्भवती झाली होती. तिला विना लग्नाची माता होणे मंजूर नव्हते. विलास भोयर सरोगसीच्या नावावर नवजात बाळांची विक्री करतो. त्याने हैदराबादच्या अपत्य नसलेल्या अभियंता दाम्पत्याशी नवजात मुलीचा सौदा केला होता. त्याने गर्भवती युवतीला नवजात मुलगी दुसऱ्याला सोपविण्यासाठी मन वळविले. प्रसूतीच्या पाच दिवसांनंतरच दाम्पत्य नवजात मुलीला घेऊन रवाना झाले. हे रॅकेट सापडल्यानंतर पोलिसांनी नवजात मुलीची सुटका करून चाईल्ड लाईनकडे सोपविले आहे.
तुरुंगात गेल्यानंतर युवती आणि तिचे कुटुंबीय नवजात मुलीला त्यांना सोपविण्याची मागणी करीत आहेत. सामाजिक दबावामुळे कुटुंबीय नवजात मुलीला परत मागत असल्याची पोलिसांना शंका आहे. नवजात मुलीची विक्री केल्यानंतर युवतीला १५ हजार रुपये मिळाले होते. ही रक्कम तिच्या आईच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर झाली होती. हैदराबादच्या दाम्पत्याने भोयरला आतापर्यंत ५.३० लाख रुपये रोख आणि ऑनलाईन पाठविले आहेत. भोयरच्या अटकेनंतर त्याचे कुटुंबीय आणि जवळचे व्यक्ती गायब आहेत. सर्वांचे फोनही बंद आहेत. यामुळे या रॅकेटमध्ये इतर व्यक्तींचा समावेश असून त्यांनी यापूर्वीही नवजात बाळांची विक्री केल्याची पोलिसांना शंका आहे. भोयर आणि त्याचे साथीदार १४ दिवसांपासून पोलिसांच्या तावडीत आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
सूत्रधार विलास भोयर मौदा, गुमथळासह ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून डॉक्टर म्हणून सक्रिय होता. निपुत्रिक दाम्पत्यांना अपत्यसुख मिळवून देण्यासाठी उपचाराच्या बहाण्याने महिला-पुरुषांना आपल्यासोबत ठेवत होता. अशात त्याने अनैतिक कृत्य केल्याची दाट शंका आहे. अनेक वर्षांपासून विलासची सत्यस्थिती पुढे येऊ नये, हे सुद्धा आश्चर्य मानले जात आहे.