नागपूर (Nagpur Crime) : २३ वर्षीय निकिता चौधरीचा अर्धवट जळालेला मृतदेह काल रात्री वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसराच्या निर्जनस्थळी आढळून आला होता. निकिताचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात निकिताची हत्या झाली नसून तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली आहे.
निकिता गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांना आहे. निकिता मंगळवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून निकिताची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या संदर्भात अंतिम निष्कर्षापर्यंत जाता येईल, असे देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.