मुंबई : कोरोनामुळे गेली दोन वर्ष होळी साजरी करता आली नव्हती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जल्लोष करत होळी साजरी करताना दिसत आहेत. त्यामुळं होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फूलं खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये सकाळी मोठी गर्दी केली आहे. पण नागरिकांचा या आनंदावर होळीच्या सणावर राज्य सरकारने काही निर्बंध लादले आहेत. होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमवलींचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
दरम्यान, होळी सणात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवण्यात आली असून या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. झाडे तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही जाती-धर्मांच्या भावना दुखावतील अशा घोषणा देण्यास व तसे फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं होळीच्या सण जरी दोन वर्षानी साजरा होत असला तरी यावर गृहविभागाने निर्बंध लादल्यामुळं नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
गृहविभागाकडून काय आहेत नियमावली?
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे.
- रात्री दहाच्या आत होळी करणे बंधनकारक केले आहे.
- डीजे लावण्यास सक्त मनाई केली आहे.
- महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी
- दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे लाऊड स्पीकर जोरात लावू नये.
- होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करू नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- धूलिवंदनाच्या दिवशी एखाद्याला जबरदस्तीने रंग लावू नये. तसेच पाण्याचे फुगे ही फोडू नये.