चंद्रपूर:- येथील काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील तीन संशयित युवकांना पाेलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही संशयित आराेपींना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. तीन दिवसांपुर्वी मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर तीन युवकांनी क्रिकेट बॅटने हल्ला केला होता. राजकीय नेत्यावरील या हल्ल्यानंतर राजकीय- प्रशासकीय वर्तुळ हादरले होते. पालकमंत्री- खासदार व भाजप नेते मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालकांपर्यंत हल्ल्याची तक्रार केली होती.
या घटनेचा शाेध लावण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी चार तपास पथके तयार करून अखेर तीन बुरखाधारी युवकांचा शोध घेतला. पाेलिसांनी रय्यतवारी कॉलरी निवासी शानु उर्फ आसिफ अली आशिक अली, राजेश केवट आणि महाकाली कॉलरी निवासी सुमित बहुरिया या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. या तिन्ही युवकांना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी मागितली जाणार आहे.
दरम्यान प्राथमिक माहितीनुसार शहरातील एका मैदानावर क्रिकेट खेळणा-या मुलांचा बॉल नागरकर यांना लागल्याने त्यांनी या मुलांना हटकले होते. त्याचा राग मनात ठेवून नगरसेवक नागरकर यांना तिघांनी लक्ष्य केले.