अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुष्ठा गावालगत असलेल्या एका शेतातील शेततळ्याजवळ इन्स्टाग्रामवर व्हिडिओ रिल्स बनवताना दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेत शिवारातील शेत तळ्याजवळ 'कच्चा बदाम' या गाण्यावर डान्स करत असताना हर्षालीचा पाय घसरला आणि शेततळ्यात बुडाली.
मृत्यूच्या काही काळानंतर दोघांनी यापूर्वी समाजमाध्यमावर केलेल्या रिल्सने हा प्रकार सर्वांच्या समोर आला. हर्षाली विनोद वांगे (११, रा. कुष्ठा) असे शेत तळ्यात पडलेल्या मुलीचे तर बाजीलाल कास्देकर (२५, कुष्ठा) असे मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचे नाव आहे.
कुष्ठा गावालगतच हरिभाऊ नाथे यांचे शेत आहे. नाथे यांच्या शेतात शेततळे आहे. या शेततळ्याजवळ हर्षाली दुपारी खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, सेल्फी घेत असताना पाय घसरुन हर्षाली शेत तळ्यात पडली. यावेळी नाथे यांच्या शेतातच काम करणारा युवक बाजीलाल कास्देकर याने हर्षालीच्या बचावासाठी शेत तळ्यात उडी घेतली.
बराच वेळ होऊनही हर्षाली किंवा बाजीलाल बाहेर आले नाही. ही माहिती गावकऱ्यांना मिळताच शेततळ्याजवळ गावकऱ्यांनी गर्दी झाली. या घटनेची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांना देण्यात आली. त्यामुळे पथ्रोट पोलिससुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सेल्फी आणि इंस्टाग्राम रिल्सवरीलसाठी अनेक जण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे समोर आले आहे.