सायकल सफरीवर गेलेल्या तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू |
औरंगाबाद शहराजवळील शेकापूर शिवारातील एका शेततळयात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. हे तिघेही गावाशेजारी सायकलवरून फिरायला गेले होते. हे तिघे शेततळ्यात कसे पडले याबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही.
सोमवारी सकाळी शेततळ्यात पडून मृत पावलेल्या तीन मुलांची नावं प्रतिक आनंद भिसे (वय१५), तिरूपती मारूती दळकर (१५) व शिवराज संजय पवार (वय १७, सर्व रा. सारा संगम, बजाजनगर), अशी असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सारा संगम सोसायटीमध्ये राहणारी प्रतिक, तिरुपती आणि शिवराज हे तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सायकल सफरीवर गेले होते. सायंकाळी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तिघांचाही खूप शोध घेतला. कुठेच मिळून न आल्याने नातेवाईकांनी रविवारी रात्री पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आज सकाळी धरमपूर शेत शिवारातील शेत तळ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मृत तिघेही सायकलवर भांगसीमाता गडाकडे फिरण्यासाठी आले होते. भांगसीमाता गडाच्या पायथ्याच्या नजीकच्या शेकापूर शिवारातील गट नं. ८ मधील नारायण हरिश्चंद्र वाघमारे यांच्या शेतातील शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, तिघांचेही मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आडे यांनी दिली.