घुंगशी बॅरेज प्रकल्पात मायलेकीचा बुडून मृत्यू
खल्लार | तालुक्यातील घुंगशी बॅरेज प्रकल्पात मायलेकीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. प्रिया गौरव तायडे वय 24 आराध्या गौरव तायडे वय 3 वर्षे रा. पारद तालुका मूर्तिजापूर जि. अकोला असे मृतक मायलेकीचे नाव असून गौरव सुरेश तायडे (30) रा. पारद हे या घटनेत आश्चर्यकारक बचावले हे मात्र खरे. पारद येथील तायडे कुटुंबीय शुक्रवारी दर्यापुर तालुक्यातील धामोडी येथे तेरवीच्या कार्यक्रमाकरिता नातेवाईकांकडे आले होते. त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम करून दोघे पती-पत्नी तीन वर्षाच्या मुली सोबत पारद येथे जाण्याकरिता रविवारी सकाळी निघाले. धामोडी तेथून पारद या ठिकाणी जाताना मधात पूर्णा नदीवरील घुंगशी बॅरेज प्रकल्प लागतो. त्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्तींना एक कुटुंब पाण्यामध्ये बुडत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी लगेच आरडाओरड करीत त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच प्रकल्पावर असलेला चौकीदार सुद्धा धावपळ करत त्या ठिकाणी आला. बुडत असलेल्या गौरव तायडे याला त्यांनी दोराच्या साहाय्याने वर काढले मात्र मायलेकीला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. त्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला.
हे देखील वाचा:
|लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
घटनेची माहिती मिळताच बाजूच्या धामोडी आणि पारद येथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना लागताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले त्यानंतर काही नागरिकांच्या सहकार्याने मायलेकींचा मृतदेह प्रकल्पातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता पाठवला. त्यानंतर मृतक महिलेच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन एकच आक्रोश केला माझ्या मुलीचा आणि नातीचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत गुन्हे दाखल होईपर्यंत शवविच्छेदन करून देण्यास नकार दिला.
हे देखील वाचा:
|Lata Mangeshkar | जरा आंख में भर लो पानी….लतादिदींंना अखेरचा निरोप
यादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मृतक महिलेचे वडील विठ्ठल पुंडकर रा. हनवतखेडा तालुका अचलपूर यांनी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वृत्तलिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.