आरमोरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात विषारीयुक्त व भेसळयुक्त गावठी दारू विक्रीचे सर्वात जास्त प्रमाण वाढले असून गावठी दारू ‘स्वस्त दरात मस्त’ मिळत असल्याने याकडे तळीरामांचा कल वाढलेला दिसून येत आहे.अशातच ‘पिणाऱ्यांची संसारे उध्वस्त तर पोलीस पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष’असल्याचे स्पष्ट चित्र आरमोरी तालुक्यात निर्माण झाले आहे.
आरमोरी तालुक्यातील मोहटोला,मेंढेबोडी,देलनवाडी, मानापूर,वैरागड व इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषारीयुक्त गावठी दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.गावठी दारूमध्ये मोहफुलाच्या नावाखाली साखर,युरिया,तांदूळ,चुना,बॅटरीचे सेल,गूळ, जंगली पत्ते,नशीली औषधे व इतर अनेक भेसळयुक्त पदार्थांची मिलावटी केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.
तालुक्यातील मोहटोला कमी वस्तीचे गांव असून गावामध्ये मोजकी घरे सोडली तर संपूर्ण गांव अवैधरित्या गावठी दारू विक्रीच्या विळख्यात सापडले असल्याचे दिसून येत आहे.गावांमध्ये भेसळयुक्त व विषारीयुक्त गावठी दारूची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात असूनही याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
गावठी दारू विक्री व पिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवानिशी खेळ सुरू असल्याने याकडे लक्ष कोण घालणार?अशी अवस्था निर्माण झाली आहे.
आरमोरी तालुक्यातील अवैधरित्या गावठी दारू विक्रेत्यांचा जोपर्यंत बंदोबस्त केला जाणार नाही तोपर्यंत ‘चलती का नाम गाडी’ व तळीराम नेसतात साडी’असे सर्वत्र चित्र दिसल्या शिवाय राहणार नाही.यासाठी विषारीयुक्त व भेसळयुक्त मोहफुलाची गावठी दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.