कानपूर ( Kanpur ): उत्तर प्रदेशच्या कानपूर (Kanpur ) शहरात रविवारी रात्री घंटाघर येथून टाट मिलकडे जाणाऱ्या एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने अनेक गाड्यांना चिरडले. या बसच्या चालकाच बसवरील नियंत्रण सुटलं होतं. रात्री साडेअकरा वाजता टाट मिल जवळ बसचा अपघात (Accident ) झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू (Six Killed Accident ) झाला असून आणखी काही लोक जखमी आहेत. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. बस चालकानं मद्यप्राशन (Bus Drink Driver ) केल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमी व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. प्राथमिक तपासामध्ये या अपघातामध्ये ड्रायव्हरची चूक असल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज देखील शोधण्याचे काम सुरू आहे. सहा जणांपैकी तीन जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करुन कानपूर मधून येणारी अपघाताची घटना ही दुःखद असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून प्रार्थना करत असल्याचं प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटलंय.