चंद्रपूर:- जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाच्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी आज सोमवारपासून हेल्मट अनिवार्य करण्यात आले आहे. वाहन चालक विनाहेल्मेट आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातात मृत्युमुखी पडल्याचे अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत दुचाकीचे एकूण ३५० अपघात झाले. त्यात १९७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १४४ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे मोटार वाहन कायद्यान्वये सक्तीचे आहे. मात्र याकडे दुचाकीचालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर १७ जानेवारीपासून दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.