चंद्रपूर विभागातील 14 कर्मचारी निलंबित
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला शासनात विलीन करण्याच्या मुख्य मागणीसाठी कर्मचार्यांनी केलेले आंदोलन सुरूच असून, त्याने महामंडळाचे नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर विभागातील वाहतूक नियंत्रकासह 14 कर्मचार्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. निलंबन काळात संबंधित कर्मचार्यांनी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश चंद्रपूर विभागाच्या वाहतूक अधीक्षकांनी निर्गमित केले आहेत. ( चंद्रपूर विभागातील 14 कर्मचारी निलंबित )
Chandrapur News: एसटी संपाबाबत राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपूर विभागातील 14 कर्मचारी निलंबित | Batmi Express
एसटी संपाबाबत राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपूर विभागातील 14 कर्मचारी निलंबितChandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,
या कारवाईने राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील कर्मचार्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात असून, आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, संप करणार्या अन्य कर्मचार्यांवरही निलंबनाची टांगती तलवार आहे. निलंबितांमध्ये चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, वरोरा, राजुरा व चिमूर आगारातील विविध पदांवर काम करणार्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
एसटी महामंडळात काम करणार्या कर्मचार्यांना अत्यल्प वेतन मिळत असून, कुटुंब चालविणे कठीण होत चालले आहे. समान काम, समान वेतन या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आंध्रप्रदेश राज्याच्या धरतीवर शासनात विलनीकरण करण्यात यावे, अशी मागणी कर्मचार्यांनी केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी 29 अॉक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा याचा मोठा फटका महामंडळाला बसत आहे. 12 दिवस लोटले तरीही अद्याप विलनीकरणाच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. जोपर्यंत विलनीकरण होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे. चंद्रपूरच्या सर्वच आगारांतून 600 ते 700 फेर्या जातात. मात्र, संपाने या सगळ्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. सगळ्या बसेस आगारात धुळ खात पडून आहे.
दरम्यान, औद्योगिक न्यायालयाने कर्मचार्यांचा संप अवैध ठरविला आहे. तशी नोटीसही आगार फलकावर लावल्या गेली. कर्मचार्यांना कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले गेले आहे. जे कर्मचारी रूजू होणार होते. त्यांनाही संपकर्यांनी कामावर जाण्यास मज्जाव केला. कर्मचार्यांच्या या वृत्तीने महामंडळाचे नुकसान झाले असून, प्रवाशांचेही हाल होत असल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर विभागातील 14 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रापमच्या विभागीय वाहतूक अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, अशी कारवाई महाराष्ट्रातील अनेक विभागांत झाली असून, केवळ चंद्रपुरात झालेली नाही. पुढच्या कारवाईबाबत आताच काही सांगता येणार नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक स्मिता साटवणे यांनी दिली.
न्यायहक्कासाठी लढा सुरूच ठेवू.....
शासनाने सातत्याने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांचे आंदोलन दपडण्याचाच प्रयत्न केला आहे. पण, मागण्यांची पूर्तता होत नाही, तोवर लढा सुरूच ठेवू. आता निलंबन करा की, सेवा समाप्त करा पण, आम्ही एकजुटीने मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढूच, असा निर्धार राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.