Mumbai Sakinaka Rape Case: मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली |
Mumbai Sakinaka Rape: मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या अत्याचार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर अत्याचार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. ( Mumbai Sakinaka Rape)
जाणून घ्या सविस्तर प्रकरण...
पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. महिलेवर उपचार सुरु होते, मात्र तिची स्थिती खूप गंभीर होती. उपचार सुरु असतानाच शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला.