अन्नावाचून तडफडून माय लेकींचा मृत्यू; चंद्रपूर हळहळलं
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. झेलाबाई पोचू चौधरी (73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (45) अशी मृतकाची नावं आहेत. त्यांच्या मृत्युच्या बातमीने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं काय आहे घटना? :
कोठारी गावातील एका घरात 73 वर्षीय झेलाबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर अनेक वर्षांपासून राहतात. त्या निराधार होत्या. त्यांना मागेपुढे कुणीही नसल्याने त्या एकमेकींच्या आधाराने जगत होत्या.
गावात मागून वा कुणी दिलेल्या अन्नावर भूक भागवित होत्या. सकाळी व संध्याकाळी गावात फिरत दिसणाऱ्या मायलेकी मागील महिनाभरापासून अचानक दिसेनाशा झाल्या होत्या. त्या आजाराने ग्रस्त व शरीराने अशक्त असल्याने बाहेर चालणे, फिरणे शक्य होत नसल्याने त्या घरातच पडून राहत होत्या. शेजाऱ्यांनीही कधी त्यांची विचारपूस केली नाही.
अशात अन्न व पाणी मिळाले नसल्याने त्या घरातच मृत्यू पावल्या. या मायलेकीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व मानवी मनाला सुन्न करून थरकाप उडविणारा होता.
शेजाऱ्यांनी त्यांच्या उघड्या घराकडे डोकावून पाहिल्यानंतर मायलेकीचा मृत्यू झाल्याचे व शरीर अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार तुषार चव्हाण व त्यांचे सहकारी पोलीस तातडीने घटनास्थळावर पोहचून प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बल्लारपुरला रवाना केले.
मायलेकीच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार गावकऱ्यांनी निधी गोळा करून केला. गावतील सामाजिक कार्य करणारे युवक नातेवाईक होऊन खांदेकरी बनले व अंतिम यात्रेत गावातील महिला पुरुषांनी अत्यंत वेदनादायी मनाने सहभागी झाले.