गावाच्या विकासासाठी निधीचा वापर करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन |
Solapur News: जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत निधी, इतर शासकीय योजनांच्या निधीचा पुरेपूर वापर करून गावांचा विकास केला आहे. या पद्धतीने जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी गावाच्या विकासासाठी निधीचा वापर करावा. प्रत्येक गावाने सुंदर गाव योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
जिल्हा परिषदेतर्फे "आर.आर. (आबा) पाटील तालुका व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार" वितरणाचा सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरावरील पुरस्कारप्राप्त माळशिरस तालुक्यातील पानीव व माढा तालुक्यातील भेंड या गावांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, कृषी सभापती अनिल मोटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह जि.प. सदस्य, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.भरणे म्हणाले, ग्रामविकास विभागामार्फत "आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार" योजना राबविण्यात येत असून आर.आर. पाटील ग्रामविकासमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून ग्रामविकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. यामुळे त्यांच्या नावे योजना राबविणे हा स्तुत्य उपक्रम आहे. पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींनी अधिक जोमाने काम करावे. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासासाठी निधी प्राप्त करून देण्यात येईल.
शासनाच्या योजना गावाचा चेहरामोहरा बदलण्यास महत्वाच्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी शासनाच्या विविध योजना राबवाव्यात. नागरिकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा परिषदमधील योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी यावेळी केले.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार या योजनेत गावांनी कौशल्य दाखवले असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.कांबळे यांनी केले.
ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला "आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार" योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा विकास साधला जाणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे श्री.स्वामी यांनी सांगितले. तालुकास्तरावरील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा श्री. भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सन 2020-21 मध्ये तालुका सुंदर गाव निवड ग्रामपंचायत नांवे- अक्कलकोट-दहिटणेवाडी, बार्शी- सुर्डी, करमाळा- कात्रज, मंगळवेढा- तांडोर, मोहोळ-येवती, उत्तर सोलापूर- कारंबा, पंढरपूर- बोहाळी, सांगोला-वाणीचिंचाळे, दक्षिण सोलापूर- निंबर्गी, माढा- भेंड, माळशिरस-पानीव.
माढा गटाकडील भेंड व माळशिरसगटाकडील पानीव ग्रामपंचातयींना समान गुण पडल्याने जिल्हा सुंदर गाव म्हणून विभागून गावांची निवड करण्यात आली आहे. तालुका सुंदर गाव पुरस्कारासाठी 10 लाख रूपये तर जिल्हा सुंदर गावासाठी 40 लाख रूपयांचे पारितोषिक आहे.