|
मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी करीता 50 लक्ष रुपये उपलब्ध करून देणार |
- रहमत नगर व बिलाल नगर प्रभागात विद्युत डीपी व खांब कामांचे लोकार्पण
Chandrapur News: स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय दूसरा पर्याय नाही. त्यामुळे मुस्लिम समाजातील पालकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ई-लायब्ररी उभारण्यासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
बिलाल कॉलनी, रहमत नगर येथे महावितरण कंपनी योजनेअंतर्गत विद्युत डीपी व विद्युत खांब या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी प्रकाश देवतळे, रामू तिवारी, हाजी सय्यद हारून, शेख जैरुद्दीन, नम्रता आचार्य ठेमस्कर तथा प्रभागातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, या लोकार्पण सोहळ्यानिमित्त या प्रभागाला भेट देण्याची संधी मिळाली. या प्रभागामध्ये विद्युत लाईनची समस्या होती, त्यामुळे येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी महावितरण कंपनी योजनेअंतर्गत नव्याने विद्युत डीपी व विद्युत पोल उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
पालकमंत्री पुढे म्हणाले, आजच्या काळात जो शिकेल तोच पुढे जाईल. शिक्षण घेतल्यास समाज, परिवार तसेच स्वतःची उन्नती होईल. जर स्वतः शिक्षित झालो नाही तर समाज व परिवार कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आयुष्यात शिक्षण हे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच या प्रभागात मुस्लिम समाजातील मुलांना अभ्यासासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ई-लायब्ररी ( वाचनालय) उभारण्यात येणार असून जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी ई-लायब्ररी ( वाचनालय) उभारणीसाठी 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. या लायब्ररीमध्ये मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून समाजाला पुढे न्यावे. स्वतःचे व समाजाचे नावलौकिक करावे.
आज घुगुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी एक मुस्लिम महिलाच आहे. तसेच याच समाजातील परभणी येथील रिक्षाचालकाचा मुलगा जिल्हाधिकारी होऊ शकतो. हे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केल्यास सर्व काही साध्य होऊ शकते. यासाठी योग्य ती मेहनत घ्यावी लागेल, तरच या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
तसेच प्रभागामध्ये नागरिकांना आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असा विश्वास पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.