Chandrapur News: कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील मोहरम निमित्त भरणारी उर्स यात्रा रद्द
Chandrapur News: सद्यस्थितीत कोरोना महामारीचा सर्वत्र प्रसार होत असल्याने राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व उच्च न्यायालय, मुंबईच्या आदेशान्वये कारागृहातील कैद्यांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.
तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यात सार्वजनिक उपक्रम सण, उत्सव, यात्रा, सभा, संमेलन इत्यादी गर्दीचे कार्यक्रमावर पुढील आदेशापर्यंत बंदी घातलेली आहे. चंद्रपूर जिल्हा कारागृह क्षेत्रात असलेले पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली बाबा दर्गाह येथे मोहरम निमित्त दि. 18 व 19 ऑगस्ट रोजी संभाव्य ऊर्स कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कारागृह परिसरात येऊ नये, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-1चे अधीक्षक वैभव आगे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांना तसेच अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. याकरिता यावर्षी मुस्लिम हिजरी सणानिमित्त मोहरम महिन्याच्या नवमी व दशमीला दि. 18 व 19 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात असलेल्या पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली दर्ग्यावर ऊर्स यात्रा भरविण्यात येणार नसून सदरची यात्रा ही यावर्षी स्थगित करण्यात आलेली आहे.