Chandrapur News: शासकीय नोकरीचा दर्जा देऊन मासिक वेतन देण्याच्या मागणीसाठी आज चंद्रपुरात आशा वर्करचा मोठा मोर्चा निघाला. स्थानिक गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. शेकडो आशा यात सहभागी झाल्या होत्या. हातात फलक घेत जोरदार नारेबाजी करीत या आशांनी आपला रोष व्यक्त केला. शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत घरोघरी जाऊन सेवा दिली.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून शासनाची मदत केली. प्रसंगी गावकऱ्यांचा रोष सहन केला. अनेकदा मारहाणही झाली. पण तरीही आम्ही सेवेत कुचराई केली नाही. शासन एकना एक दिवस आमची आशा पूर्ण करेल, या आशेवर आम्ही राहिलो.
पण आमचा भ्रमनिरास झाला. सेवेत कायम करणे तर दूर, नियमित मानधन सुद्धा दिलेले नाही. दरम्यान, आता आरपारची लढाई आम्ही लढणार असून, वेतनाची ग्वाही दिल्याशिवाय कामावर जाणार नाही, असा इशारा या आशांनी दिला आहे.