Yavatmal Corona Outbreak: जिल्ह्यात प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती तर प्रत्येक नगर पालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत ‘आम्ही यवतमाळकर मात करू कोरोनावर’ ही विशेष मोहीम जिल्ह्यामध्ये 12 एप्रिल ते 19 एप्रिल 2021 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
सदर मोहिमेअंतर्गत ग्रामस्तरावर व नगरपालिका स्तरावर पथकांची निर्मिती करणे व या पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरीकांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामध्ये कोविड – 19 पंचसुत्री, यात मास्कचा सतत वापर करणे, सुरक्षित अंतर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, लक्षणे असल्यास / सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ चाचणी करणे, 45 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र व्यक्तींचे लसीकरण करणे, याबाबत जनजागृती करण्यात यावी.
तसेच दिलेल्या विवरणपत्रात सर्वेक्षणाबाबत माहिती घेऊन दैनंदिनरित्या जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे आदेशात नमुद आहे. यात खालील बाबींचा समावेश असावा.
कुटुंबातील व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणे आढळून येत आहे काय, वृध्द, दिव्यांग, सहव्याधीने ग्रस्त व्यक्ती यांना काही त्रास आढळून येत आहे काय, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोविड – 19 रुग्णांच्या संपर्कात आला आहे का तसेच त्यांना लक्षणे आहे काय, कुटुंबातील 45 वर्षावरील पात्र सदस्यांनी लसीकरण केले आहे काय. सर्वेक्षणादरम्यान एखाद्या व्यक्तीमध्ये कोविड 19 लक्षणे आढळून आल्यास त्यांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचाराबाबत कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात म्हटले आहे.